Tuesday, March 24, 2020

नानगांव येथे निर्जंतुक औषध फवारणी !


दौंड | नानगाव - कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून त्याची खबरदारी म्हणून नानगांव (ता. दौंड) येथील ग्रामपंचायतीकडून गावात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. नानगांव हे गाव शिरूर- दौंड तालुक्‍याला जोडणारे असल्याने या गावातून सातत्याने प्रवाशांची वर्दळ असते.

परंतु गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर येथील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. केवळ अत्यावश्‍यक सेवा व सुविधा सुरू आहेत.
करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यात येत असून संपूर्ण गावात औषध फवारणी करण्यात येत आहे. नागरिकांमध्ये देखील जनजागृती केली जात आहे, अशी माहिती नानगांव ग्रामपंचायतच्या सरपंच पुष्पा गुंड यांनी दिली.

शासनानेही जमावबंदी आदेश लागू केल्यानंतर घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांच्या वतीने कठोर कारवाई केली जात आहे. मेडिकल, किराणा दुकान, दूध डेअरी या अत्यावश्‍यक सेवा वगळता परिसरात सर्व दुकाने बंद असून पोलीस प्रशासनाच्या वतीने परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.