दौंड प्रतिनिधी : ता.२३ मार्च
दौंड तालुक्यातील वरवंड येथे असणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनवर चार चोरट्यांनी सशस्त्र हल्ला करून तेथे कार्यरत असणाऱ्या गणेश शितोळे (वय 35) या ऑपरेटरला गावातील लाईट बंद कर असे म्हणून त्याच्या डोक्यात कुर्हाड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार आज दि.२३ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडला आहे. या हल्ल्यामध्ये एमएसईबीचे ऑपरेटर गणेश शितोळे हे गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर चोरट्यांनी शितोळे यांच्या खिशातील ४ हजार रोख रक्कम, दोन मोबाईल आणि दुचाकी असा ऐवज घेऊन ते पसार झाले असल्याची माहिती शितोळे यांनी दिली आहे.
माहिती मिळताच यवत, पाटस पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली असून गणेश शितोळे यांना साईदर्शन या खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.