Saturday, February 29, 2020

मढी येथील मानाच्या होळीबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील - नंदकुमार पवार

पाथर्डी  प्रतिनिधी : ता.२९ फेब्रु 

श्री क्षेत्र मढी या ठिकाणी कानिफनाथ महाराज मंदिर असून भटक्या विमुक्तांची पंढरी म्हणून या ठिकाणाला महत्व आहे.सदर मंदिराचे बांधकाम करण्याकामी गोपाळ समाजाची महत्वाची भूमिका होती.त्यामुळे गोपाळ समाजाला होळीच्या दिवशी सर्वप्रथम होळी पेटवण्याचा मान असतो.
श्री क्षेत्र मढी या ठिकाणाची मानाची होळी पेटवल्यानंतरच संपुर्ण भारतभर होळी पेटवली जाते. परंतु आजपर्यंत गोपाळ समाजातील काही कुटुंबांनी समाजाची दिशाभूल करून होळी पेटवण्याचा मान स्वतःकडेच ठेवला आहे.परीणामी समाजातील इतर लोकांना होळीचा मान आजतागायत घेता आला नाही. त्यामुळे होळीच्या दिवशी श्री क्षेत्र मढी या ठिकाणी संपूर्ण भारतातून येणाऱ्या समाजाची लोकसंख्या वर्षानुवर्षे कमी होत चालली आहे. त्यामुळे समाजाचे दरवर्षी एकत्र येऊन होणारे कार्यक्रम व प्रबोधन होत नाही.मढी येथे होणारी आर्थिक उलाढाल कमी होत चालली आहे. मोठया पोलीस बंदोबस्तामुळे राज्य शासनाचा खूप मोठा खर्च होऊन पोलीस डिपार्टमेंटला मानसिक तनावाला सामोरे जावे लागत आहे. म्हणून चालू वर्षी श्री क्षेत्र मढी या ठिकाणी मानाची होळी पेटवण्याचा मान नवीन व्यक्तींना रोटेशन पद्धतीने देण्यात यावा याबाबत भारतातील गोपाळ समाजातील प्रतिनिधींनी ठराव करून नवीन मानकऱ्यांबाबतचे निवेदन देवस्थान ट्रस्टला दिनांक 10 फेब्रुवारी 2020 ला दिले होते. त्यानंतर जुने मानकरी यांच्या खोट्या सह्या करून काही लोकांनी देवस्थान ट्रस्ट ला 13 फेब्रुवारी 2020 ला अर्ज करण्यात आला होता. देवस्थानकडे दोन अर्ज आल्यामुळे होळी यात्रेचे अध्यक्ष या नात्याने त्या दोन्ही अर्जाबाबत निर्णय देण्यासाठी देवस्थान ट्रस्ट ने मा तहसीलदार पाथर्डी यांना निवेदन पाठवले.त्यांनतर तहसीलदार यांनी सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2020 ला दोन्ही अर्जदारांना बोलावून सुनावणी घेतली. त्यामध्ये जुने मानकरी यांच्या वतीने पंडित लोणारे,माणिकराव लोणारे व नामदेव माळी यांनी आपली बाजू एकही पुरावा न देता मांडली अशी माहिती यावेळी गोपाळ समाजहित महासंघ पश्चिम महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पवार यांनी दिली आहे.
तसेच नवीन मानकरी यांच्या वतीने नंदकुमार पवार व सुभाष गव्हाणे यांनी सर्व पुराव्यानिशी आपली बाजू मांडली. नवीन मानकरी यांना मान देण्यात यावा यासाठी भारत देशातील विविध राज्यातील व जिल्ह्यातील जवळपास 800 ते 900 सह्यांचे निवेदन तसेच महाराष्ट्र राज्यातील गोपाळ समाजाच्या दोन मोठ्या संघटनांच्या ठरावाच्या प्रति सुद्धा देण्यात आल्या होत्या,तरी तहसीलदारांनी नवीन मानकरी यांचा अर्ज निकाली काढला आहे. 1999 साली झालेल्या सुलेनाम्या नुसार भारतातील समाज बांधव ठरवतील त्यांना मान देण्यात येईल असे पाथर्डी कोर्टासमोर निर्णय झाला असताना सुद्धा देवस्थान ने 1999 ते आजपर्यंत त्याच त्या लोकांना होळी चा मान दिल्यामुळे कोर्टाचा देखील अवमान झाला असून,तहसिलदार यांनी कोणत्या कागद पत्रांच्या आधारे व कोणत्या कायद्याच्या आधारे संबंधित नवीन मानकरी यांचा अर्ज फेटाळला हा एक मोठा प्रश्न असून त्याबाबत जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे अपील केले आहे. तसेच लवकरच सामाजिक न्याय मंत्री यांना भेटणार असल्याची माहिती गोपाळ समाजहित महासंघ महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

"जुने मानकरी हे स्वयंघोषित मानकरी असून ते विशिष्ट 6 कुटुंबाचेच प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यामुळे यावर्षी संपूर्ण भारतातुन येणारे समाजबांधव होळीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असून, यापुढे सदर मानकऱ्यां बाबतची कायदेशीर लढाई चालू ठेवणार असून लवकरच समाजाला न्याय मिळेल"

        - भाऊसाहेब चौगुले- पुणे जिल्हा अध्यक्ष,                 गोपाळ समाजहित महासंघ