पारगाव प्रतिनिधी : ता.२७ फेब्रु २०२०
पारगाव ता.दौंड येथील भीमा नदीच्या शेजारी सुनील शेळके आपला मुलगा आनंद सोबत मॉर्निंग वॉकसाठी जात असताना आपल्या शेतामध्ये गव्हाच्या पिकात काही अंतरावर बिबट्या नजरेस पडला.
भयभीत झालेले शेळके यांनी त्वरित ही माहिती ग्रामस्थांना कळवली.ग्रामस्थांनी वनविभागाला बिबट्या असल्याची माहिती देण्यात आली. सर्व माहितीची खातरजमा करून वन विभागाकडून पुणे येथील रेस्कु टीमला बोलावण्यात आले.यानंतर पाच तासाच्या आत अथक परिश्रमानंतर वन विभागाच्या रेस्कु टीमला जाळ्यात अडकलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले.
या मिशनमध्ये वन विभागाचे 35 कर्मचारी सहभागी होते. या मिशनचे नेतृत्व पुणे येथील उपवनसंरक्षक ए.लक्ष्मी व दौंडचे वन परीक्षक महादेव हजारे यांनी केले होते.
सविस्तर हकीकत अशी,एका शिकाऱ्याने रान डुक्कर पकडण्यासाठी लावलेल्या जाळीमध्ये बिबट्याचा पाय अडकला होता.वन विभागाच्या रेस्क्यू टीमच्या वतीने बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देण्यात आले व त्यानंतर बिबट्या पकडण्यात आला.
पुढील उपचारासाठी बिबट्याला पौड येथे नेण्यात आले आहे अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या सहा महिन्यापासून भीमा नदीच्या पट्ट्यात अनेक बिबटे पाहायला मिळत आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामध्ये पाळीव प्राण्यांचा बिबट्या फडशा पाडत आहे.एक दिवस माणसावर बिबट्या हल्ला करेल तेव्हाच वनविभाग खडखडून जागा होईल का? असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे.
ग्रामस्थांच्यावतीने वन विभागाला अजून काही पिंजरे लावण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.