Tuesday, May 15, 2018

दौंडमध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन


दौंडमध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन

दौंड प्रतिनिधी :  कै.सुभाषआण्णा कुल चॅरिटेबल मेमोरिबल ट्रस्टच्या माध्यमातून शुक्रवारी (दि. 18) रोजी महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दौंड तालुक्‍याचे आमदार अँड. राहुल कुल यांनी दिली.
समाजातील आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल,मागास आणि गरजू रुग्णांना योग्य वैद्यकीय मदत मिळवून देण्याच्या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्र शासन,आरोग्य विभाग, पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग,धर्मादाय आयुक्त संलग्न रुग्णालये, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना,दौंड तालुका आणि शहर मेडिकल असोसिएशन,रोटरी क्‍लब ऑफ दौंड,निमा दौंड,भीमथडी शिक्षण संस्था दौंड,दौंड तालुका केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कै.सुभाषआण्णा कुल चॅरिटेबल मेमोरिबल ट्रस्टच्या माध्यमातून महाआरोग्य मेळावा 2018 दौंडचे आयोजन कुरकुंभ रोड, दौंड येथे करण्यात आले आहे.पुणे जिल्ह्यासह मुंबईमधील अनेक नामवंत रुग्णालयांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती आमदार अँड. कुल यांनी दिली.
या महाआरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया,अँजिओप्लास्टी,बायपास शस्त्रक्रिया,सांधे बदलणे,डोळ्यांचे नंबर तपासणे आणि चष्मे वाटप,लहान मुलांचे टाळू व दुभंलेले ओठ शस्त्रक्रिया,हॅर्निया हायड्रोसिल,गर्भ पिशवीची शस्त्रक्रिया,सर्व प्रकारच्या कॅन्सरवरील उपचार,टूडी इको तपासणी,आवश्‍यकतेनुसार एमआरआय तपासणी आदी तपासण्या आणि शस्त्रक्रिया मोफत करून दिल्या जाणार असल्याची माहिती आमदार अँड.राहुल कुल यांनी पुढे बोलताना दिली. या मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांच्या आजाराचे प्राथमिक निदान झाल्यानंतर आवश्‍यक त्या सर्व तपासण्या आणि पुढील उपचार सहभागी असलेल्या रुग्णालयांच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.या मेळाव्यासाठी नावनोंदणी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय दौंड,ग्रामीण रुग्णालय यवत,तसेच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि आपल्या खाजगी डॉक्‍टर्सकडे संपर्क साधण्याचे आवाहन आमदार कुल यांनी केले आहे.