Sunday, December 15, 2019

कुसेगाव येथे देव-दानव युद्धाचा थरार !


पाटस प्रतिनिधी : ता.१५ डिसें २१०९

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील कुसेगाव येथे शुक्रवारी (ता
१३) रोजी  देव-दानव युद्धाचा थरार पाहायला मिळाला. 
निमित्त होतं भानोबा देवाच्या यात्रेचं.बोल भानोबाचं.. चांगभलं.. म्हणत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी कुसेगाव (ता.दौंड) येथे भानोबा देवाचे मोठ्या भक्तीमय वातावरणात दर्शन घेतले. यात्रेच्या पहिल्या दिवशी भानोबा देवाच्या गाव प्रदक्षिणेच्या वेळी देव-दानव यांच्या प्रतिकात्मक युद्ध झाले. रणभूमीवर दानवांचे मुडदे पडले.
श्री क्षेत्र कुसेगाव येथील भानोबा देवाची यात्रा ही संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहे. भानोबा देवाच्या यात्रेनिमित्त देवाचा अभिषेक,ओलांडा,पोवाडा, कुस्त्या,लोकनाट्य आदी विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू असल्याने अवघा परिसर भक्तिरसात चिंब झाला होता.
अशी आहे भानोबा देवाची आख्यायिका..भानोबा देव हे (कोयाळी,ता.खेड) येथे दुष्काळ असल्यामुळे (मंगळवेढा,जि.सोलापूर) येथे आपली गुरे चरण्यासाठी गेले असता तेथे रामोशी व मातंग समाज यांच्यामध्ये घनघोर युद्ध होऊन भानोबा देवाचा येथे वध करण्यात आला असा पुराणात उल्लेख आहे.तसेच जुने जाणकारही सांगतात.याचाच बदला म्हणून या यात्रेत रामोशी व मातंग समाज बांधवांमध्ये भानोबा देवाच्या यात्रेच्या पालखी सोहळ्यात प्रतिकात्मक युद्ध केले जाते. युद्धभूमीवर प्रतिकात्मक मुडदे पडतात.युद्धभूमीवर पडणाऱ्या व्यक्ती तब्बल दोन तास बेशुद्धावस्थेत असतात. यावेळी भानोबा देवाचा घाम बेशुद्ध पडणाऱ्या व्यक्तिवर टाकून कानामध्ये भानोबाचं चांगभलं बोललं जातं.तेव्हा कुठे बेशुद्ध व्यक्ती शुद्धीवर येत असते.ही आख्यायिका पाहण्यासाठी व देव दर्शनासाठी भाविक भक्तांची गर्दी संपूर्ण महाराष्ट्रातून येथे उमडत असते.