Monday, October 8, 2018

धनगर समाजाची नागपूर ते पंढरपूर संघर्ष यात्रा !

धनगर समाजाची नागपूर ते पंढरपूर संघर्ष यात्रा
 डी न्यूज लाइव्ह प्रतिनिधी | केडगाव | -   धनगर समाजाला हिवाळी अधिवेशनापर्यंत  अनुसुचित जमातीच्या सवलती दिल्या नाही तर पंढरपूर येथे आमरण उपोषण करण्यात येईल. त्या अगोदर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समाज 22 ऑक्टोबरपासून नागपूर ते पंढरपूर संघर्ष रथयात्रा काढणार आहे. असा इशारा दौंड तालुक्यातील चौफुला येथे देण्यात आला आहे. 2014 मध्ये बारामतीतील आरक्षण आंदोलनाची पुनरावृत्ती पंढरपुरात होणार का अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.   

     आरक्षणाच्या लढयासाठी चौफुला येथे राज्यस्तरीय चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले होते. रथ यात्रेच्या आयोजनासाठी धनगर समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेमध्ये संघर्ष रथ यात्रेची माहिती देण्यात आली. राज्य समन्वय समितीचे सदस्य बापूसाहेब हाटकर ( मुंबई ), संदीपान नरवटे ( मराठवाडा ), विठ्ठल मारनर ( उत्तर महाराष्ट्र ), पांडुरंग मेरगळ व अशोक चोरमले ( पश्चिम महाराष्ट्र ), राम मरगळे ( कोकण ), देवेंद्र उगे ( विदर्भ ) श्रावण वाकसे ( मुंबई ) हजर होते. 

संघर्ष यात्रा 22 ऑक्टोबरला नागपूर येथून प्रस्थान करेल. चार चाकी वाहनांमधून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून जाईल. सात नोव्हेंबरला रथ यात्रेचे जेजूरी येथे आगमन होईल. जेजूरी ते पंढरपूर पायी यात्रा निघून ती 17 नोव्हेंबरला पंढरपूर येथे पोहचणार आहे. तेथे महाराष्ट्रातील सकल धनगर समाजाच्यावतीने आमरण उपोषणाला कार्यकर्ते बसतील. एस.टी.चे जात प्रमाणपत्र घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार यावेळी करण्यात आला आहे. धनगर समाज बांधवांनी 17 नोव्हेंबरनंतर पंढरपूर येथे पाठिंब्यासाठी मोठया संख्येने उपस्थित रहावे.  

   पांडुरंग मेरगळ म्हणाले,  हे सरकार समाजासाठी एस.टी. समावेशाची प्रक्रीया राबवत आहे. परंतु  घटनेत समाजाचा अनुसुचीत जातीमध्ये समावेश आहे. या आरक्षणाची सरकारने तातडीने अंमलबजावणी सरकारने करावी अशी सकल धनगर समाजाची मागणी आहे. मुळात एसटीमध्ये समावेश करावा अशी मागणी धनगर समाजाने केलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः बारामती येथे आश्वासन दिले होते मात्र चार होऊनही त्यांनी ते पुर्ण 

केलेले नाही. सरकारने अंमलबजावणी केली नाही तर सरकारला ही आंदोलनाची झळ बसल्याशिवाय राहणार नाही. अॅड. दौलत ठोंबरे म्हणाले, इतर  राज्यांनी केंद्राची शिफारस न घेता धनगर समाजाचा समावेश एसटीमध्ये केला आहे. 

      यावेळी तळोदा संस्थानचे संस्थानिक अमरसिंहराजे बारगळ, मोरेश्वर झिले, आनंद थोरात, अॅड.जी.बी.गावडे, अॅड. दौलत ठोंबरे, महेश नाईक, विजय गावडे, राधाकिसन रौंधळे, बाळासाहेब कोळेकर, संगिता डोके, पांडुरंग रूपनवर, बाळासाहेब तोंडेपाटील, विठ्ठल कोकरे, तुकाराम साठे, पोपट मेरगळ, ललित बंडगर, बाळासाहेब गरदरे, डॅा. प्रशांत शेंडगे, डॅा.अभिमन्यू टकले, रमेश वाघे उपस्थित होते.