केडगाव प्रतीनिधी : ता.०४ नोव्हेंबर २०१९
पारगाव (ता.दौंड) नजीक २२ फाटा येथे शनिवारी (ता.०२) रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्याला पिंजर्यामध्ये जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
या बिबट्याला बिबट निवारण केंद्रामध्ये वनविभागाकडून रात्री उशिरा पर्यंत हलविण्यात आले होते.गेल्या अनेक दिवसापासून या परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढला होता.ग्रामस्थांनी वनखात्याला निवेदने व मागणी केल्यानंतर वनखात्याने पिंजरा लावला होता.पिंजऱ्याच्या आतमध्ये जिवंत कोंबड्या ठेवण्यात आल्या होत्या.
पारगाव व नानगाव परिसरात अजून किती बिबटे आहेत हे न उलगडलेले एक कोडेच आहे.कारण यापूर्वी सहा महिन्याच्या कालावधीत तीन बिबटे पकडण्यात आले आहेत.अजून पारगाव परिसरात एक बिबट्या आणि दोन बिछडे वावरत असल्याचे नामदेव गोलांडे यांनी सांगितले आहे.
तसेच येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.कारण अजून अनेक बिबटे येथील परिसरात वावरत असल्याचे नागरिकांनी सांगितले.त्यामुळे शेतकरी वर्ग शेतात जाण्यास घाबरत आहेत.वनविभागाकडून अजून किमान दोन पिंजरे लावण्यात यावे अशी मागणी येथील नागरिक करत आहेत