Thursday, October 30, 2025

सोळाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दशरथ यादव यांची निवड

सोळाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य 
संमेलनाच्या अध्यक्षपदी दशरथ यादव यांची निवड

डॉ जयप्रकाश घुमटकर यांची माहिती

पुणे, दि. २९ :  सोळाव्या अखिल भारतीय मराठी
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांची निवड करण्यात आली आहे.
मराठी साहित्य मंडळ, मुंबई यांच्या वतीने मंगळवार दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी केडगाव जिल्हा अहिल्यानगर येथे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती साहित्य मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ जयप्रकाश घुमटकर यांनी दिली.

      साहित्य संमेलनांचे उद्घाटक आमदार संग्राम जगताप असून, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ नंदकुमार राऊत, डॉ घनश्याम पांचाळ, ललिता गवांदे आदी उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष जयद्रथ खताळ आहेत. संमेलनांचे संयोजन नानासाहेब डोंगरे, बाळासाहेब देशमुख, अनिता काळे, सुदर्शन धस, आशा शिंदे, भीमराव घोडके, बबनराव खामकर आदींनी केले आहे.

        श्री. यादव हे गेली पंचवीस वर्षे साहित्य, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी विपूल लेखन केले आहे. वारीच्या वाटेवर या गाजत असलेल्या ऐतिहासिक महाकांदबरीचे ते लेखक आहेत. यादवकालीन भुलेश्वर या संशोधनपर पुस्तकाच्या तीन आवृत्या निघाल्या आहेत. उन्हातला पाऊस (कवितासंग्रह), शिवधर्मगाथा, मातकट, गुंठामंत्री, सुतसंस्कृती, साहित्यिक संभाजी, जेजुरीचा खंडोबा, पुरंदरचे कोहिनूर, पोवाडा पुरुषोत्तमाचा, महाराष्ट्र शाहीर, घुंगुरकथा, सत्यशोधक दिनकरराव जवळकर, वारीचे अंभग आदी पुस्तकाचे लेखन केले आहे.

      दिंडी निघाली पंढरीला (सिनेमाची कथा), रणांगण (पटकथा आणि संवाद), ढोलकीच्या तालावर (गीतलेखन), गुंठामंत्री (कथा), सत्याची वारी ( व्हिडीओ पटाचे लेखन), भक्तीसागर (व्हिडीओ पटाचे लेखन), दैवत माझे भुलेश्वर माहिती पटासाठी गीत लेखन, महिमा भुलेश्वराचा (गीत अल्बम),गाव कवितेचा, कवि मुलांच्या भेटीला या उपक्रमाचे राज्यभर शेकडो कार्यक्रम. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बहिशाल विभागात व्याख्याता म्हणून काम. आकाशवाणी, दुरदर्शन, व चँनेलवर कवि संमेलनाचे शेकडो कार्यक्रमातून सहभाग. सासवड येथे झालेल्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रवक्ते म्हणूनही काम केले. या पूर्वी त्यांनी बारामती येथे झालेल्या पहिल्या लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलन, 
सासवड येथे झालेल्या दहाव्या राज्यस्तरीय महात्मा फूले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन, दौंड येथील पहिले भीमथडी मराठी साहित्य संमेलन, सोलापूर येथील ग्रामीण मराठी साहित्य संमेलन अशा अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.

Saturday, October 25, 2025

विजेचा शॉक लागून पती,पत्नीचा मृत्यू ; नानगाव येथील धक्कादायक घटना!


दौंड, ता.२६ : नानगाव (ता. दौंड) येथील गावात आज (दि. २२) रोजी सायंकाळच्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. भीमा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या विद्युत प्रवाहाला शॉकमुळे पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम बापूराव खळदकर व मनीषा राजाराम खळदकर हे दोघे आपल्या जनावरांसाठी भीमा नदीच्या तीरावर चारा आणण्यासाठी गेले असता विजेचा शॉक लागल्याने जखमी झाले. घटनेनंतर लगेचच दोघांना केडगाव येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
हा प्रकार नेमका कसा घडला, कोणत्या उपकरणातून शॉक लागला, याची चौकशी पोलीस व महावितरण विभाग करत आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे नानगाव गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांनी कुटुंबीयांना भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली.