Sunday, November 18, 2018

मार्बल फरशी चोरणाऱ्या पाच जणांच्या टोळीला यवत पोलिसांनी केले जेरबंद !!


डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी:_दौंड तालुक्यातील नांदूर येथील मिराज सिरामिक्स टाईल्स कंपनीमध्ये कंपनीच्या स्विकृटीगार्डच्या मदतीने (दि.१५) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास १७ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे २ हजार मार्बल फरशी बॉक्स टेम्पोमधून चोरणाऱ्या पाच जणांच्या टोळीला यवत पोलिसांनी स्थानिक ग्रामसुरक्षा दल मित्रांच्या मदतीने जेरबंद केले आहे. इतर सात आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले असून यातील पसार झालेले बहुतेक आरोपी स्थानिक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना दौंड न्यायालयाने (दि.२२) नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे यांनी दिली.

या प्रकरणी धीरेंद्रकुमार जाट (वय १९), प्रदीपकुमार दयाल (वय ३०), कुलदीप चाक (वय ३०), पवनकुमार शर्मा (वय २१), आकाश कुमार रॉय (वय २४ वर्षे सर्व मूळ रा. उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या पाच आरोपींची नावे आहेत. तर या चोरी प्रकरणी कंपनीचे मालक श्रीकांत सुधीर खाडिलकर (वय ५१ वर्षे रा. मुलुंड, मुंबई) यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि.१५) रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास नांदूर गावच्या हद्दीत असलेल्या मिराज सिरामिक्स या टाईल्स कंपनी मधील गोडाऊन मधून टाईल्स फरशीची चोरी करण्यात येत असल्याबाबतची माहिती यवत पोलिसांना खबऱ्या मार्फत मिळाली. त्यानुसार रात्रीच्या सुमारास पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे, सहाय्यक फौजदार परशुराम पिलाणे, विनोद रासकर, अजित काळे यांचे पोलीस पथक या कंपनीत गेले. यावेळी या स्टाईल फरशीच्या कंपनीत बारा आरोपी टेम्पो क्रमांक (एमएच ४२ एक्यु २१६९) मध्ये १ लाख ७५ हजार किंमतीचे १७० फरशी बॉक्स चोरून नेहण्याच्या उद्देशाने भरत असताना पोलीस पथकाला आढळले. यावेळी या पोलीस पथकाला पाहून सात आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले तर पोलिसांनी स्थानिक ग्राम सुरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पाच आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. पोलिसांनी मार्बल फरशीसह टेम्पो ताब्यात घेतला आहे. या आरोपींनी गेल्या वीस दिवसात या चोरी व्यतिरिक्त १६ लाख रुपयांचे १ हजार ८३० टाईल्स बॉक्स चोरुन नेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या चोरी प्रकरणात स्थानिकांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे करीत आहेत.