दौंड, ता.२६ : नानगाव (ता. दौंड) येथील गावात आज (दि. २२) रोजी सायंकाळच्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. भीमा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या विद्युत प्रवाहाला शॉकमुळे पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम बापूराव खळदकर व मनीषा राजाराम खळदकर हे दोघे आपल्या जनावरांसाठी भीमा नदीच्या तीरावर चारा आणण्यासाठी गेले असता विजेचा शॉक लागल्याने जखमी झाले. घटनेनंतर लगेचच दोघांना केडगाव येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
हा प्रकार नेमका कसा घडला, कोणत्या उपकरणातून शॉक लागला, याची चौकशी पोलीस व महावितरण विभाग करत आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे नानगाव गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांनी कुटुंबीयांना भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली.