Wednesday, November 13, 2024

दौंड विधानसभा मतदारसंघात 1 हजार 3 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बजावला टपाली मतदानाचा हक्क

दौंड विधानसभा मतदारसंघात 1 हजार 3 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बजावला टपाली मतदानाचा हक्क

दौंड, दि. 14 : दौंड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या कर्तव्यावर कार्यरत असलेल्या 1 हजार 3 अधिकारी कर्मचाऱ्यांनी संत तुकडोजी विद्यालय, एसआरपीएफ कॅम्प येथे टपाली मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड यांनी दिली आहे. 

विधानसभा मतदारसंघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याकडून नमुना 12 भरुन घेण्यात आले होते. टपाली मतदानाकरीता संत तुकडोजी विद्यालय एकूण 3 टपाली मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली. यावेळी निवडणुक कर्तव्यावर असलेल्या 1 हजार 3 अधिकारी कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 408 पोलीस कर्मचारी सहभागी होते. टपाला मतदान प्रक्रियेकरीता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत काळे, टपाली मतदान नोडल अधिकारी दिनेश अडसूळ व सहायक पोपट कुंभार यांनी नियोजन केले होते, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री. मरकड यांनी दिली.

Sunday, November 10, 2024

दौंड विधानसभा मतदार संघातील उमेदवारांची दैनंदिन खर्च तपासणी संपन्न

दौंड विधानसभा मतदार संघातील उमेदवारांची दैनंदिन खर्च तपासणी संपन्न

पुणे, दि.११ :  दौंड विधानसभा मतदार संघाचे खर्च निरीक्षक डॉ.ए.व्यंकदेश बाबू यांच्या उपस्थितीत आणि निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवारांची पहिली दैनंदिन खर्च तपासणी करण्यात आली. 

श्री. बाबू यांच्याकडून उमेदवारांच्या ८ नोव्हेंबर अखेरच्या खर्चाच्या हिशोबाच्या नोंदवह्याची प्रथम खर्च तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांनी खर्च विषयक मार्गदर्शन करुन सूचना दिल्या. 

यावेळी १४ उमेदवारापैकी १३ उमेदवारांची खर्च तपासणी करण्यात आली. अपक्ष उमेदवार रमेश थोरात यांना खर्च तपासणीच्यावेळी अनुपस्थित राहिल्याबद्दल खर्च निरीक्षक यांच्या डॉ. बाबू यांच्या सुचनेनुसार नोटीस बजावण्यात आली आहे. उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची दुसरी तपासणी १४ नोव्हेंबर रोजी व तिसरी तपासणी १८ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री. मरकड यांनी दिली आहे. 

यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरूण शेलार, विजय कावळे, सहायक खर्च निरीक्षक विकास मीना, मुकेश ठाकूर, समन्वय अधिकारी (खर्च व्यवस्थापन कक्ष) तेजस्विनी बोकेफोड, एफएसटी, एसएसटी, व्हीएसटी, व्हीव्हीटी पथकाचे नोडल अधिकारी राहुल माने आदी उपस्थित होते.

Tuesday, November 5, 2024

रमेश थोरात यांच्या प्रचार संवाद दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद


रमेश थोरात यांच्या प्रचार संवाद दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद 

दौंड प्रतिनिधी, ता. ५ : दौंड विधानसभा निवडणुकीचा जोर सध्या वाढु लागला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रमेश थोरात यांनी प्रचार संवाद दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यामध्ये लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे पहावयास मिळाले. यामध्ये नानगाव, कानगाव, हातवळण, कडेठाण, दापोडी या गावांमध्ये प्रचार संवाद दौऱ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळाली.

दापोडी येथे बाईक रॅली काढण्यात आली तर कानगाव येथे बैलगाडीमधुन मिरवणूक काढण्यात आली. दापोडी येथे भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यामध्ये छबु रुपनवर माजी ग्रामपंचायत सदस्य, शरद थोरात,नारायण नरुटे,संजय ठोंबरे व आदी मान्यवरांनी प्रवेश केला. यावेळी नागरिकांनी आलेल्या अडचणीचा पाढा रमेश थोरात यांच्या समोर वाचला. यावर तोडगा काढण्याचे आश्वासन रमेश थोरात यांनी यावेळी दिले.